मुंबई – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षकांची जम्बो भरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ७ हजार ४२५ सुरक्षा रक्षक पदे भरली जाणार आहेत. ही भरती माजी सैनिक प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करणाऱ्यांना संधी मिळणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी येत्या २ नोव्हेंबर पर्यंत आपापल्या जिल्हाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला भेट द्यावी. सोबत डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, एम्प्लॉयमेंट कार्ड घेऊन प्रत्यक्ष भेट नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. सुरक्षारक्षक पदासाठी पात्रता अशी (अनुक्रमे वय, शिक्षण, सैन्य दलातील सेवा, सैन्य दलातील चारित्र्य, मेडिकल कॅट या क्रमाने). एक ऑक्टोबर 2021 रोजी 45 वर्षांपेक्षा कमी वय असावे, किमान आठवी उत्तीर्ण परंतु बारावी उत्तीर्ण नसावा, किमान 15 वर्षे नोकरीचा अनुभव असावा. हवालदार म्हणून निवृत्त झालेल्यांना प्राधान्य असेल. आरोग्य चांगले असावे. आयशेप- 1 असावी, असे सांगण्यात आले आहे.