मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्टेट बँक या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या विविध कर्मचारी संघटनांनी २८ आणि २९ मार्च रोजी संप पुकरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)च्या विविध कामगार संघटनांनीही २८ व २९ मार्च (सोमवार व मंगळवार) रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे २६ ते २९ मार्चपर्यंत स्टेट बँक आणि एलआयसी बंद राहणार आहे. मार्च अखेरीस बँक आणि एलआययी बंद राहणार असल्याने त्याचा आर्थिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यापूर्वीच आपली महत्त्वाची कामे करून घ्यावी लागणार आहे.
भारतीय स्टेट बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार, एसबीआयने संपादरम्यान आपल्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. परंतु संपामुळे बँकेचे कामकाज काही प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ येऊ घातला आहे. त्यास कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. याचाच एक भाग म्हणून आता दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय संघटनांनी केली आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाचा सपाटा लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण आणि बँक कायदा संशोधन विधेयक २०२१ च्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, भारतीय बँक संघ (आयबीए) ने सूचित केले आहे, की अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए), भारतीय बँक कर्मचारी फेडरेशन (बीईएफआय) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना (एआयबीओए)ने नोटीस देऊन देशव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती दिली आहे.
सलग चार दिवस बंद
संपामुळे आगामी २६ ते २९ मार्चपर्यंत सलग चार दिवस स्टेट बँक आणि एलआयसी बंद राहणार आहे. २६ मार्चला चौथा शनिवार आणि २७ मार्चला रविवार आहे. साप्ताहिक सुटीमुळे बँक बंद राहील. २८ आणि २९ मार्चला संपामुळे बँकेचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.