मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक बुडणे किंवा बँकेकडून फसवणूक होणे हे प्रकार अनेकदा घडतात, तसेच बँकेलाच गंडा घालणे किंवा कर्ज घेऊन बुडवण्याचे प्रकार देखील अनेकदा घडतात. मुंबईत देखील असाच एक प्रकार उघडकीस आला असून एका सोने चांदी व्यापारी तथा ज्वेलर्सने एका राष्ट्रीयकृत बँकेला बँकेची मोठी फसवणूक केली आहे.
देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत सुमारे ८१ हजार कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल २३ हजार प्रकरणे घडली आहे. आता मुंबईत पुन्हा एक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांची घडणावळ तसेच हिरे निर्यातीत कार्यरत असलेल्या अंधेरीमधील सीप्झस्थित यश ज्वेलर्स या कंपनीने स्टेट बँकेला ४०५ कोटी ५८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाने केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद गोएंका २०१८ पासून बेपत्ता आहेत. त्यांचा मुलगा यशवर्धन गोएंका याने याबाबत तक्रार देखील पोलिसांत केलेली आहे.
रुस्तुम टाटा व अनंत प्रभुदेसाई हे देखील याप्रकरणी आरोपी आहेत. व्यवसाय विस्तारासाठी यश ज्वेलर्स या कंपनीच्या संचालकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या कारणासाठी वापर करण्याऐवजी कंपनीने ते पैसे विविध मार्गांनी अन्य कंपन्यांत तसेच परदेशात वळविल्याचे दिसून आले. या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे हे कर्ज आणि त्यावरील व्याज असा ४०५ कोटी रुपयांचा फटका स्टेट बँकेला बसला आहे. कंपनीचे कर्ज खाते सर्वप्रथम थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, कंपनीने मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याची उघड झाली.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला होता. एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील आघाडीच्या २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केली होती, सीबीआयने सबळ पुरावे हाती येताच याप्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले होते. एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ दरम्यान हा घोटाळा झाला असून कंपनीच्या तत्कालीन तीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
State Bank of India SBI 405 Crore Fraud Jewelers Crime CBI