विशेष प्रतिनिधी, मुंबई
जर आपण नोकरदार असाल तर तुम्हाला सॅलरी अकाऊंटची माहिती नक्कीच असेल. आपण ज्या कंपनीत नोकरी करता ती कंपनी कोणत्याही बँकेत तुमचे सॅलरी अकाऊंट उघडून देते. त्यानंतर दर महिन्याला त्याच खात्यात वेतन जमा होते. बँकसुद्धा सॅलरी अकाऊंटवाल्यांना खूप साऱ्या योजनांचा लाभ घेण्याची संधी देते. मात्र तुमचे सॅलरी अकाऊंट स्टेट बँकेत असेल तर अनेक वेगवेगळ्या सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, सॅलरी अकाऊंट होल्डरला त्याच्या खात्यात कुठलेही मिनीमम बॅलन्स ठेवण्याची बंधने नाही. या खातेदारांना विम्याचाही लाभ देण्यात येतो. शिवाय गृह कर्ज, पर्सनल लोन, कार लोन आणि एज्युकेशन लोनवरही सवलत मिळते.
एसबीआयमध्ये सॅलरी अकाऊंट असलेल्या खातेदारांना कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले तरीही अतिरिक्त शुल्क लागत नाही. या खात्यासोबत तुम्हाला एसबीआयचे क्रेडिट कार्डही मिळते. एखाद्याचे एसबीआयमध्ये सॅलरी अकाऊंट आहे आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला २० लाख रुपये मिळतात. याशिवाय ३० लाख रुपयांचा एअर एक्सीडेंट कव्हर (डेथ) ही पॉलिसी होल्डरला मिळतो.
ज्यांचे सॅलरी अकाऊंट आहे त्यांना आकर्षक दरांमध्ये पर्सनल लोन, होम लोन, कार लोन व एज्युकेशन लोन उपलब्ध करून दिले जाते. यात प्रोसेसिंग फीमधून सवलत मिळत असते. लॉकर चार्जवरही 25 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते. या खातेदारांसाठी डिमॅट आणि आनलाईन ट्रेडिंगची अकाऊंटची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्लॅटिनम खाते
एसबीआयच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार एक लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले लोक बँकेत प्लॅटिनम सॅलरी अकाऊंट उघडू शकतात. 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेले डायमंड आणि 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे गोल्ड खाते उघडू शकतात. 10 ते 25 हजार रुपये वेतन असलेले खातेधारक सिल्व्हर अकाऊंट उघडू शकतात.