मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी पैशाशी संबंधित एक नियम बदलला आहे. १ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जर, आपण स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर आपण हा नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला कमी खर्च येईल. वास्तविक, एसबीआय ने त्यांच्या बँक शाखेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तात्काळ पेमेंट सेवेची (IMPS) मर्यादा वाढवली आहे. हे नवीन दर दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. एसबीआय ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, YONO अॅपसह इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाखांपर्यंतच्या तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहारांसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक आता IMPS द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट त्वरित करू शकतील. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.
आता तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन IMPS केल्यास, तुम्हाला जीएसटीसह सेवा शुल्क भरावे लागेल. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या शाखांमधून केल्या जाणाऱ्या IMPS व्यवहारांसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सेवा शुल्क 20 रुपये प्लस GST असेल. या सूचना दि.1 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाल्या आहेत.
इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे केलेल्या कोणत्याही IMPS व्यवहारावर 5 लाखांपर्यंत GST वर कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. एसबीआय ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या कोट्यावधी आहे.
बँक शाखेसाठी एसबीआय IMPS शुल्क असे
> 1000 रूपयांपर्यंत – कोणतेही शुल्क नाही
> 1000 रुपयांच्यावर आणि 10,000 पर्यंत – 2 रूपये + GST
> 10,000 रूपयांच्या वर आणि 1,00,000 रुपयांपर्यंत – 4 रुपये + GST
> 1,00,000 रुपयांच्या वर आणि 2,00,000 पर्यंत -12 रुपये + GST
> 2,00,000 रुपयांच्या वर आणि 5,00,000 रुपयांपर्यंत – 20 रुपये + GST