मुंबई – एसबीआयने आपल्या गृहकर्ज धारकांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट दिले आहे. कर्जाच्या व्याजदरात 0.45 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. याशिवाय लवकरात लवकर कर्ज मिळावे यासाठी क्रेडिट स्कोअर लिंक होणं लोन घेण्याची शिफारस केली आहे. यात कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्कही लागणार नाही.
सणासुदीच्या काळात घर खरेदीला बऱ्यापैकी प्राधान्य असते. गुंतवणूक म्हणून, सेकंड होम म्हणून किंवा अन्य कारणांसाठी घरांचे बुकिंग होत असते. एसबीआयने व्याज दर कपातीची घोषणा केली आहे. आतापर्यंत 75 लाखांपेक्षा जास्त होम लोन घेणाऱ्यांना 7.15 टक्के एवढा व्याज दर होता. कपात झाल्यानंतर आता कितीही रकमेपर्यंतचे कर्ज घेतले तरी व्याजदर 6.70 टक्के असेल. हे दर सर्वांसाठी समान असतील. यापूर्वी फिक्स इन्कम नसणाऱ्यांसाठी 0.15 टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदर होता. पण आता तोही 6.70 वर आणण्यात आला आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये आमचे व्याजदर आकर्षक राहतील, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतल्याचे एसबीआयचे रिटेल आणि डिजिटल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी यांनी सांगितले. बँक ऑफ बडोदाने देखील गृह आणि गाडीच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच प्रोसेसिंग शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. कपातीनंतर गृह कर्जाचे व्याज दर 6.75 तर गाडीवरील कर्जाचे दर 7 टक्के एवढे असतील.