मुंबई – बँकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा बँकांना लाखोंचा दंडही भरावा लागला आहे. आता आरबीआयची वक्रदृष्टी भारतीय स्टेट बँकेवर (एसबीआय) पडली असून, बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमनाचे पालन न केल्याने आरबीआयने एसबीआयवर ही कारवाई केली आहे.
आरबीआयच्या माहितीनुसार, आर्थिक स्थिती संदर्भात ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१९ दरम्यान एसबीआयच्या देखरेखीसंदर्भातील मूल्यांकनाविषयी वैधानिक निरीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार एसबीआयने जोखीम मूल्यांकन अहवालात, तसेच निरीक्षण अहवालात बँकिंग विनियमन अधिनियमातील एका तरतुदीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
एसबीआयने कर्जदार कंपन्यांच्या प्रकरणात कंपन्यांच्या बंद केलेल्या शेअरच्या रकमेच्या तीस टक्क्यांहून अधिक रकमेचे शेअर गहाण ठेवले होते. या प्रकरणी आरबीआयने एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला एसबीआयने उत्तर दिल्यानंतर आरबीआयने बँकेला दंड ठोठावला.
ऑक्टोबरमध्येही दंड
आरबीआयने एसबीआयवर ऑक्टोबरमध्ये सुद्धा एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. फसवणुकीचे वर्गीकरण आणि माहिती दिल्या जाण्यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन व्यवसायिक बँकांनी न केल्यामुळे हा दंड करण्यात आला होता.