विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्यासह आर्थिक संकटाचा सामना करणार्या लोकांना एसबीआयने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांची आर्थिक ओढाताण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने शुक्रवारी (११ जून) ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचे कवच खासगी कर्ज (KAVACH Personal Loan) असे नामकरण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पाच लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.
हे कर्ज गरजूंना पाच वर्षांसाठी दिले जाईल. कर्जाचे व्याजदर ८.५ टक्के असेल. या योजनेत तीन महिन्यांचे मोरेटोरियमसुद्धा मिळणार आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारावरील खर्च या पैशांतून करता येणार आहे.
ग्राहक स्वतःसह त्याच्या कुटुंबीयांच्या कोरोना उपचाराकरिता हे कर्ज घेऊ शकतात. ही अनोखी कर्ज योजना लेटरल फ्री पर्सनल लोनच्या वर्गांतर्गत लाँच करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना कर्ज घेताना काहीही गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही, असे एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी म्हटले आहे. या श्रेणीतील बँकेचे सर्वात कमी व्याजदर असतील. कोरोनाच्या कठिण परिस्थितीत लोकांना आर्थिक सहाय्य करणे हाच आमचा उद्देश असल्याचे दिनेश खारा यांनी स्पष्ट केले आहे.