अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या ४५ कोटी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
सध्या ऑनलाइन बँकिंग फ्रॉड हा प्रकार प्रचंड वाढताना दिसत आहे. अनेकांची लुबाडणूक मोबाईलच्या माध्यमातून बँक डिटेल्स काढून होत आहे. तशा स्वरुपाच्या अनेक तक्रारीही पोलिसांकडे केल्या जात आहे. या सगळ्या प्रकरणामुळे नागरिकही हतबल होताना दिसत आहेत. याचे गांभीर्य ओळखत बँकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे ग्राहकांनी पाळली तर ऑनलाइन फसवणुकीपासून ते दूर राहू शकतात. यात बँकेने म्हटले आहे की, प्रिय ग्राहक.. तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात! त्यामुळे सुरक्षित डिजिटल बँकिंग अनुभवासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
१. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, म्हणजे ई-मेल/एसएमएस वरून मिळालेल्या संलग्नकांवर.
२. एसबीआय कधीही तुमची वैयक्तिक माहिती विचारणारी कोणतीही लिंक पाठवत नाही.
३. तुमचा पासवर्ड/कार्ड क्रमांक/CVV/OTP सारखी आर्थिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.
४. बक्षिसे/लॉटरी/आयकर परताव्याच्या ईमेल/एसएमएसने फसवू नका.
५. कृपया नियमित अंतराने तुमचा पासवर्ड बदलत राहा.
६. असे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका ज्याला काही अज्ञात व्यक्तीने सल्ला दिला असेल. तुम्ही त्या मेसेजवर क्लिक करताच तुमच्या बँकेचे तपशील फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
ग्राहकांनी येथे करावी तक्रार
SBI चे नाव वापरून संशयास्पद ईमेलची तक्रार करण्यासाठी तुम्ही [email protected] वर लिहू शकता.