मुंबई – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने आपल्या मूळ व्याजदरात (बेस रेट) १० बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. आता एसबीआयचा मूळ व्याजदर ७.५५ टक्के झाला आहे. त्यामुळे कर्जाचे हफ्ते चुकवणार्या ग्राहकांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. ही वाढ केल्याने आता देशात स्वस्त कर्ज उपलब्ध राहण्याचे दिवस आता संपले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्टेट बँकेने यापूर्वी सप्टेंबरमध्ये आपले मूळ व्याजदर पाच बेसिस पॉइंटने घटवून ते ७.४५ टक्के केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर यामध्ये दहा पॉइंटची वाढ करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने ८ डिसेंबरला झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. आरबीआयने रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम ठेवला होता. त्यानंतर बँका आपल्या पातळीवर व्याजदरात वाढ करू शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. एसबीआयने हा निर्णय घेऊन त्याची सुरुवात केली आहे.
एफडी व्याजदरात वाढ
एसबीआयने मूळ व्याजदर वाढवून ग्राहकांना झटका दिला आहे. तसेच मुदतठेवींच्या (एफडी) व्याजदरात सुद्धा वाढ केली आहे. परंतु याचा लाभ मोठ्या ग्राहकांनाच होणार आहे. कारण दोन कोटीं रुपयांहून अधिक मुदतठेवींवरील व्याजदर वाढविण्यात आले आहेत. मूळ व्याजदर हा अर्थव्यवस्थेचा सूचकांकही असतो. एसबीआयने व्याजदर वाढविल्याने देशात स्वस्त कर्ज उपलब्ध होण्याचा काळ आता संपला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसबीआयने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर आता इतर बँकासुद्धा त्याचीच री ओढण्याची शक्यता आहे. मूळ व्याजदरात वाढ होण्याचा परिणाम बँकांकडून देण्यात येणार्या कर्जावरही होणार आहे. कर्जावरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे धोका
या महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती कोसळून ६५ डॉलर प्रतिपिंप इतक्या झाल्या होत्या. १६ डिसेंबरला त्या वाढून पुन्हा ७२ डॉलर प्रतिपिंप झाल्या आहेत. यावरून जगात कच्च्या तेलाची मागणी वाढल्याचे संकेत मिळत आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वाढत असल्याने सुद्धा चिंतेत भर पडत आहे. ओमिक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवता आले तर जगात कच्च्या तेलाची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. घाऊक मूल्य सूचकांकात तीव्र वाढ झाल्यानेही व्याजदरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बेस रेट म्हणजे काय
कोणतीही बँक कमीत कमी व्याजदरावर ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देते. त्याला बेस रेट अर्थातच मूळ व्याजदर असे म्हणतात. ज्या ग्राहकांनी व्याजांचे अस्थिर दरांवर म्हणजेच परिवर्तनशील दरांवर गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेतले असतील,त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. ग्राहकांना अधिक हफ्ता चुकवावा लागेल किंवा त्यांच्या कर्जाची मुदत वाढवली जाईल. म्हणजेच अधिक काळ कर्जाचे हफ्ते चुकवावे लागतील.