विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली असून कोरोना साथीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच महिलांसाठी खास होमलोन ऑफर्स दिल्या आहेत.
एसबीआयने पत्रकात म्हटले आहे की, 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.70 टक्क्यांपासून व्याजदर सुरू होईल आणि 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जात व्याज दर 6.95. टक्के असेल. गृह खरेदीदारांना 75 लाखाहून अधिक गृह कर्जावर 7.05 टक्के व्याज द्यावे लागेल. एसबीआय ही देशातील एकमेव अशी बँक आहे, जेथे गृह कर्जाचे दर 6.70 टक्क्यांपासून सुरू होत आहेत.
बँकेचे एमडी (रिटेल अॅण्ड मार्केटींग) सी.एस. शेट्टी म्हणाले की, बँकेच्या या धोरणामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे ईएमआय कमी होईल. केवायसीच्या बाबतीत एसबीआयनेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
अनेक राज्यांत कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लक्षात घेता आता केवायसी देखील पोस्टद्वारे किंवा नोंदणीकृत ई-मेलद्वारे पाठविलेल्या कागदपत्रांमधून अद्ययावत केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. केवायसी अद्ययावत करण्यासाठी ग्राहकांना यापुढे बँक शाखेत भेट देण्याची गरज भासणार नाही. तसेच केवायसी 31 मे 2021 पर्यंत अद्ययावत न केल्यास बँकिंग सेवा सुरूच राहतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) महिलांसाठी खास ऑफर्स दिल्या आहेत, सध्या गृहकर्ज दर 6.70 टक्के आहे. जर एखादी महिला गृह कर्जासाठी अर्ज करत असेल तर तिला पाच बेस पॉईंट (0.05 टक्के) पर्यंत सूट मिळेल. त्याचबरोबर होम लोन ग्राहकांना बँक अॅपद्वारे कर्ज घेण्यासाठी पाच बेसिस पॉईंटपर्यंत सवलत मिळेल. डिजिटल प्रोत्साहन वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसबीआयने म्हटले आहे.