मुंबई – स्टेट बँक आफ इंडियाचे गृहकर्ज १ एप्रिलपासून महाग झाले आहे. बँकेने नवे व्याजदर जाहीर करताना आता ६.९५ टक्क्यांपासून सुरुवात केली आहे. यापूर्वी रिअल इस्टेट सेक्टरमधून मागणी वाढावी म्हणून दर घटविण्यात आले होते. ६.७० टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला होता.
बँकेने ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ६.७० टक्के आणि ७५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ६.७५ टक्के व्याजदर घोषित करण्यात आला होता. मात्र ही ऑफर केवळ ३१ मार्चपर्यंत होती आणि १ एप्रिलपासून ती संपुष्टात आली आहे.
एसबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, गृहकर्जाचा नवा दर ६.९५ टक्के आहे. देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एसबीआयने गृहकर्जाचे व्याजदर वाढविल्यामुळे इतर खासगी बँका व हाऊसिंग फायनान्स कंपन्या देखील गहकर्ज महाग करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्टेट बँकेने प्रोसेसिंग फी माफ केली होती. मात्र आता पूर्ण प्रोसेसिंग फी घेतली जाणार आहे. कर्जाच्या एकूण रकमेच्या ०.४० टक्के प्रोसेसिंग फी लागेल. प्रोसेसिंग फीसोबत जीएसटीही भरावा लागेल. प्रोसेसिंग फी कमीत कमी १० हजार आणि जास्तीत जास्त ३० हजार असणार आहे.
गेल्या महिन्यापर्यंत सणावारांचे दिवस लक्षात घेता बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फी माफ केली होती. एसबीआयच्या गृहकर्ज महाग करण्याच्या निर्णयाचे परिणाम रिअल इस्टेट सेक्टरवर होऊ शकतात. गेल्या पंधरा वर्षांमध्ये व्याजदरात सर्वांत मोठी घट झाल्यामुळे रिअल इस्टेटमधून मागणी वाढली होती. गेल्या सहा महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायही या क्षेत्रात बघायला मिळाला.