मुंबई – गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डधारकांची संख्या सर्वाधिक आहे. वेळोवेळी विविध नियम बसत असल्याने क्रेडिट कार्ड धारकांना अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे लागते. आताही स्टेट बँकेने क्रेडिट कार्ड धारकांना दणका दिला आहे.
तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) क्रेडिट कार्ड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवर १ डिसेंबरपासून सर्व ईएमआय खरेदी व्यवहारावर ९९ रुपयांचे प्रक्रिया शुल्क आणि कर आकारला जाणार आहे. सध्या ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क अदा करावे लागते. म्हणजेच आता कर्जाप्रमाणे क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार आहे.
एसबीआय कार्डतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, कार्डद्वारे मर्चेंट आउटलेट्सवर करण्यात आलेल्या सर्व ईएमआय खरेदी व्यवहारावर प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे. यामुळे बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) या पर्यायाद्वारे खरेदी महाग होऊ शकते. आतापर्यंत ग्राहकांना प्रक्रिया शुल्क देण्यात गरज पडत नव्हती. क्रेडिट कार्डद्वारे ईएमआयवर खरेदी करण्यावर कार्ड प्रदाता संस्थेकडून वसूल केल्या जाणार्या व्याजाच्या रकमेव्यतिरिक्त हे प्रक्रिया शुल्क वसूल केले जाणार आहे. ईएमआय व्यवहार रद्द होण्याच्या परिस्थितीत प्रक्रिया शुल्क परत केले जाईल.