नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समजल्या जाणाऱ्या एबीजी शिपयार्ड घोटाळा प्रकरणामुळे भारतीय स्टेट बँकेच्या ताळेबंद पत्रकांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही जास्तीत जास्त वसुली करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. एसबीआयने या प्रकरणी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार, आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वात दोन डझनहून अधिक नागरिकांना कंसोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्ये कंपनीचे खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) झाले होते. कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही.
जोखीम अनुपालन आणि तणाव मालमत्ता निराकरण गटाचे व्यवस्थापकीय संचालक स्वामिनाथन सांगतात, एबीजी शिपयार्डने २००१ पासून जवळपास २८ बँकांचे कर्ज घेतले होते. कंपनी दीर्घकाळ सुरू राहू शकली नाही. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक या नात्याने एसबीआयला इतर बँकांकडून सीबीआयकडे तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत करण्यात आले होते. पहिली तक्रार २०१९ मध्ये नोंदवण्यात आली होती. डिसेंबर २०२१ मध्ये एक व्यापक तक्रार नोंदवण्यात आली होती. ही कंपनी २०१३ पासून एनपीए झाली आहे. साधारण सर्व कॉर्पोरेट कर्जांच्या प्रकरणात असेच होते. तक्रार करण्यास उशीर झाला आहे, असे आपण म्हणू शकत नाही. या प्रकरणात आयसीआयसीआयतर्फे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल २०१९ मध्ये समोर आला होता. यामध्ये संबंधित पक्षांना पैसे हस्तांतरण आणि इतर उद्देशांसाठी पैशांचा वापर करण्याचे संकेत देण्यात आले होते. चर्चा झाल्यानंतर सर्व बँकांनी २०१९ मध्ये हे खाते घोटाळा असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांच्या एका गटाने कथितरित्या २२,८४२ कोटी रुपयांहून अधिकच्या फसवणुकीप्रकरणी ८ नोव्हेंबर २०१९ मध्ये तक्रार नोंदवली होती.
दीड वर्षांहून अधिक काळ तपास चालल्यानंतर सीबीआयने यावर कारवाई करत एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हृषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अग्रवाल यांच्यासह तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेतिया तसेच एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या आणखी एका कंपनीविरुद्ध कथितरित्या गुन्हेगारी कट रचल्याचा, फसवणूक, गुन्हेगारी, विश्वासघात आणि अधिकारीपदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने शनिवारी सुरत, भरुच, मुंबई, पुणे आदी ठिकाणी एका खासगी कंपनी, संचालकांच्या ठिकाणांसह १३ ठिकाणी छापे मारून तापस केला. यादरम्यान संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे.