मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण, स्टेट बँकेने आज मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका बँकेच्या देशातील कोट्यवधी कर्जधारकांना बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला किरकोळ खर्च आधारित कर्ज दर (MCLR) 0.1 टक्क्यांनी वाढवला आहे. या निर्णयामुळे कर्जदारांचा EMI वाढला आहे.. देशातील सर्वात मोठ्या या बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा MCLR वाढवला आहे आणि दोन्ही वेळा मिळून आतापर्यंत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता. यानंतर एसबीआयने यात वाढ केली. एसबीआयने कर्जदरात सुधारणा केल्यानंतर, येत्या काही दिवसांत इतर बँकाही असेच करतील अशी अपेक्षा आहे.
या वाढीसह, ज्या ग्राहकांनी MCLR वर कर्ज घेतले आहे त्यांचा EMI वाढला आहे. तथापि, इतर पॅरामीटर्सशी जोडलेल्या कर्जाचा EMI वाढणार नाही. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सुधारित MCLR दर 15 मे पासून लागू झाले आहेत. या दुरुस्तीनंतर, एक वर्षाचा MCLR 7.10 टक्क्यांवरून 7.20 टक्के झाला आहे. बहुतेक कर्जे एका वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली असतात. एक रात्र, एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्क्यांवर गेला, तर सहा महिन्यांचा MCLR 7.15 टक्क्यांवर गेला.
दरम्यान, गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे. त्याशिवाय आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक EMI भरावा लागणार आहे.