मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय स्टेट बँक एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांसाठी आवश्यक सूचना आहे. एटीएम कार्डद्वारे देशभरात वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना ओटीपी नोंदवण्याच्या सूचना केल्या आहेत. एटीएमद्वारे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी बँकेने १ जानेवारी २०२२ पासून ओटीपी आधारावरील व्यवहाराची सुरुवात केली होती. आता एसबीआयकडून ग्राहकांना वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत.
असा आहे नियम
एटीएम कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून रोखण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना ओटीपी आधारित रोकड काढण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा १० हजार आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर लागू करण्यावर देण्यात आली आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविण्यात आलेला ओटीपी आणि त्यांच्या पिनसोबत प्रत्येकवेळी एटीएममधून १० हजार आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते.
यासंदर्भात एसबीआयने नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात एसबीआयने म्हटले आहे की, एटीएमच्या व्यवहारात आमच्या ओटीपी आधारित रोकड काढण्याची प्रणाली भामट्यांविरुद्ध लसीकरण आहे असे समजा. तुमची फसवणूक रोखण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
अशी आहे प्रणाली
१) सर्वप्रथम एसबीआय ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल.
२) हा एटीएम नोंदवून ग्राहक पैसे काढू शकणार आहेत.
३) ओटीपी हा एक चारअंकी संख्या असेल, त्याद्वारे एकदाच आर्थिक व्यवहार करता येईल.
४) एटीएममधून अनधिकृतरित्या पैसे काढण्यावर यामुळे आळा बसेल.