इंडिया दर्पण वृतसेवा – गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये बँकेतील रक्कमेची चोरी करणे, एटीएम मधून लंपास करणे, ऑनलाईन बँकिंग मध्ये सायबर क्राईम सारखे गुन्हे घडत आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एटीएमच्या कॅश डिस्पेन्सिंग शटरमध्ये छेडछाड करून सुमारे 4.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बदमाशांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची सात महिन्यांत सुमारे 4.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सप्टेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान, संबलपूर आणि रेंगाली शहरातील नऊ एसबीआय एटीएममध्ये विविध बँकांची 25 कार्डे 4,630 वेळा वापरली गेली. विशेष म्हणजे एटीएमच्या कॅश डिस्पेन्सिंग शटरमध्ये हाताने छेडछाड करून पैसे काढण्यासाठी अज्ञात दरोडेखोरांनी ‘एक्झिट शटर मॅनिपुलेशन फ्रॉड’चा वापर केला. बदमाश त्यांचे कार्ड एटीएम मशिनमध्ये घालायचे आणि पिन आणि विनंती केलेली रक्कम टाकल्यानंतर पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.
त्यानंतर दरोडेखोर एटीएमचे शटर ठप्प करायचे आणि एटीएममधून पैसे काढल्यानंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याचा आरोप करत तेवढीच रक्कम मागायचे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, संबलपूर शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेच्या मुख्य व्यवस्थापकाने या फसवणुकीबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली.