मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत अर्ज करत आहात, किंवा तुम्हाला अर्ज करायचा असले, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सीबीआय या केंद्रीय तपास संस्थेने भारतीय स्टेट बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ही अटक ज्या प्रकरणात झाली आहे, ती कर्ज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी एक धडाच आहे.
सीबीआय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अमरावतीमधील एसबीआय कर्मचारी आणि त्याच्या साथीदाराला लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. एसबीआयचा हा कर्मचारी, पीडिता ग्राहकाला गृहकर्जाचे टॉप अप आणि मंजुरीसाठी २० हजार रुपयांची लाच मागत होता. या प्रकरणात सीबीआयने नियोजन करून आरोपीला अटक केली.
सीबीआयशी संपर्क करणाऱ्या पीडितेने अमरावतीच्या इक्विटास स्मॉल फायनांन्स बँकेकडून १२ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. पीडिता आपले कर्जाचे खाते आयसीआयसीआय बँकेच्या गाडगे बाबा नगर शाखेत हस्तांतरित करण्यास इच्छुक होती. त्यादरम्यान तिची एसबीआयच्या कर्मचाऱ्याशी भेट झाली.
एसबीआयच्या कर्माचाऱ्याने कर्जखाते हस्तांतरित करण्याची जबाबदारी घेतली. आरोपीने पीडितेचे कर्जाचे खाते आयसीआयसीआय बँकेत हस्तांतरित केलेच नाही, तर एसबीआय कँप शाखेत हस्तांतरित केल्याचा दावा केला. पीडितेने कर्जाचे खाते हस्तांतरित करण्यासह एसबीआयकडे टॉप-अप कर्जाला मंजुरीसाठीसुद्धा अर्ज केला. आरोपीने कथितरित्या पीडितेच्या घराचा दौरा करून कामाच्या बदल्यात तिच्याकडून २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचून आरोपीला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.