नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहसा क्रेडिट कार्डचा उल्लेख निघाला की पैशांची उधळपट्टी एवढेच डोळ्यापुढे येते. लोक आनंदाने खर्च करतात आणि कंपन्या अर्थात बँका अतिरिक्त शुल्क जोडून ग्राहकांना लुटतात, एवढेच आपल्याला माहिती आहे. पण दिल्लीतील एका प्रकरणात ग्राहक न्यायालयाने चक्क क्रेडिट कार्ड कंपनीलाच २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दिल्लीतील माजी पत्रकार एमजे अँथनी यांच्यासोबत एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीने केलेला प्रकार कंपनीच्याच अंगलटी आला आहे. अँथनी यांच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड होते. त्यावरील सर्व देयके चुकवून झालेली होती. त्यानंतर कार्डची मुदतही संपून बरेच दिवस झालेले होते. एक दिवस अचानक अँथनी यांना एसबीआ क्रेडिट कार्डने थकबाकी असल्याचे बील पाठवले.
त्यांनी पुन्हा एकदा तपासून बघितले तर संपूर्ण पैसे भरलेले होते आणि मुदत संपूनही बरेच दिवस झाले होते. त्यामुळे त्यांनी चौकशी केली तर एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीने अँथनी यांना डिफॉल्टर ग्राहकांच्या यादीत टाकून दिले होते. त्यामुळे त्यांच्या सीबीलवर परिणाम झाला. यावर ग्राहक न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
अँथनी यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. तिथे झालेल्या सुनावणीत अँथनी यांनी घडलेल्या प्रकारामुळे झालेला मनस्ताप सांगितला. एकही रुपयांचे बील शिल्लक नसताना कंपनीने बील तर पाठवलेच, शिवाय मला डिफॉल्टर घोषित केल्यामुळे माझे सीबीलही खराब झाले, अशी कैफियत त्यांनी मांडली. त्यावर ग्राहक न्यायालयाने एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सीबीलवर परिणाम
अँथनी यांचे नाव सीबील सिस्टीममध्ये टाकल्यानंतर इतर बँकांनीही त्यांचा क्रेडिट कार्डचा अर्ज स्वीकारला नाही. खरे तर हे नुकसान पैशाने भरून निघणारे नाही. पण कंपनीला दंड ठोठावल्याशिवाय समज येणार नाही. त्यामुळे एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे, असे ग्राहक न्यायालय म्हणाले. दोन महिन्यांच्या आत ही रक्कम अँथनी यांच्या खात्यात जमा करावी, असेही आदेश देण्यात आले.
State Bank Credit Card Fine Mistake