मुंबई – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयचा एक नियम आहे, ज्यामुळे तुमच्या खिशाला झळ पोहोचू शकते. अनेकदा आपण व्यवहार करतो पण बँकांच्या नियमांकडे डोळेझाक करतो. पण, पासबुक किंवा स्टेटमेंट हाती आले की नक्की काय झाले आहे याचा पत्ताच लागत नाही. त्यामुळे स्टेट बँकेत जर तुम्ही रोख रक्कम भरायला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठई अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या बँक खात्यात दुसऱ्याने पैसे जमा केले, तर तुमच्याच खात्यातून पैसे कपात होतात. कॅश डिपॉझिट मशीन अर्थात सीडीएमच्या माध्यमातून पैसे जमा करण्यावर हा नियम लागू होतो. सीडीएमच्या माध्यमातून पैसे जमा केले तर २५ रुपयांपर्यंत शुल्क कपात होऊ शकते. त्यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे.
मशिनचे काम काय
एसबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही एटीएमसारखीच मशिन आहे. या मशिनमध्ये तुम्ही एटीएम किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकता. बँकेत न जाताच तुम्ही या मशिनमधून खात्यात पैसे जमा करू शकता. आर्थिक व्यवहाराची पावती तुम्हाला मिळेल.
मशिनचे फायदे
– तुमच्या खात्यात त्वरित पैसे जमा होतात.
– कागदाचा वापर न करता व्यवहार
– प्रतिदिन व्यवहार मर्यादा ४९,९०० रुपये आहे. डेबिट कार्डच्या माध्यमातून २ लाख रुपये आहे. (खात्यात पॅन नोंदवला असेल तर)
– पीपीएफ, आरडी आणि कर्जखात्यातही रक्कम जमा करू शकतात.
– एका वेळच्या व्यवहारात २०० नोट जमा केले जाऊ शकतात.
– सीडीएम फक्त १०० रुपये, ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकारते.
– मागील दहा आर्थिक व्यवहाराची माहिती तुम्हाला मिळू शकते.