नाशिक -कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात आजपासून पुढील १० दिवसाचा कडक लाॅकडाऊन करतांना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे त्यामुळे सलग १० दिवस बाजार समित्या बंद ठेवण्याऐवजी किमान एका दिवसाआड बाजार समित्यांचे एका सत्रात कांदा लिलावाचे कामकाज सुरू ठेवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते कांदा हे हंगामी पीक असून अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये कांदा हेच प्रमुख नगदी पीक असल्याने तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारी साठी खते बी-बियाणे, शेतीची पुर्वमशागत यासाठी कांदा उत्पादकांना केवळ कांदा विक्रीतूनच पैसे उपलब्ध होणार असल्याने तसेच कांदा उत्पादकांच्या कुटुंबातील कोणी सदस्य खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्यास औषधे व दवाखान्याच्या बिलासाठी कांदा विक्रीतून पैसे उभे करणे शेतकऱ्यांसाठी जरुरीचे आहे. हवामान खात्याने पुर्व मोसमी पावसाचा अंदाज दिलेला असल्याने कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळींची सुविधा नसलेल्या कांदा उत्पादकांचा कांदा आजही शेतात उघड्यावर तर काही शेतकऱ्यांचा कांदा झाडाखाली पडलेला असून अशा शेतकऱ्यांना त्यांचा कांदा आता विक्री करता न आल्यास बेमोसमी व पुर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे.