मुंबई – केंद्र शासनने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन निर्णय दि. 8.3.2019, 9.12.2020 व 26.3.2021 अन्वये योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सूची जाहिर केलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे सांकेतिक क्रमांक 201903081643216222, 202012101531252722 व 202103261633277622 असे आहेत.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने 10 टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर 15 टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.
त्या अनुषंगाने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-400071 कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.