मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या चार महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने आज दुपारी शरद पवार यांच्या निवासस्थानी येत आंदोलन केले. काही जणांनी निवासाच्या दिशेने चप्पल भिरकावली तर काहींनी गेटजवळ येऊन जोरदार निदर्शने केली. परिस्थिती लक्षात घेता मुंबई पोलिसांची आणखी कुमक घटनास्थळी दाखल झाली. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या घराबाहेर आल्या आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखविली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल गृह विभागाने घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मुख्य मागणी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. त्यातच आता न्यायालयाने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान गाठले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, काहींनी घराच्या दिशेने चप्पल भिरकावली. काहींनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर, काहींनी गेटवर आक्रमक आंदोलन केले. हा सर्व प्रकार पाहता मुंबई पोलिसांनी या सर्व आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभिर्य पाहून खासदार सुळे यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. मात्र, चर्चा होऊ शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतरही राज्य सरकारच्यावतीने पक्षाच्या खासदार @supriya_sule यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी शांततेच्या मार्गाने संवाद साधण्याची भूमिका घेतली. pic.twitter.com/f0Y2tJiama
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 8, 2022
दरम्यान, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुप्तचर यंत्रणेला या हिंसक आंदोलनाची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. गृहविभागाने आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनामागे कुणाचा हात आहे, हे शोधले जाणार आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक याचा तपास करण्याची शक्यता आहे. तर, या हिंसक आंदोलनाबाबत विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया आता येत आहेत.