किरण घायदार, नाशिक
सरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १,०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदांवर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. तसेच प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व – ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे व रिक्त जागांनुसार एसटीच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची – बैठक पार पडली. या बैठकीत सवलत मुल्य रक्कम साधारण ३५० कोटी रुपये इतकी दर महिन्याला होते. सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती होत नाही. ही रक्कम एसटीला देताना सरकारने कधीच पूर्णपणे दिलेली नाही.
विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.
त्यापैकी मुंबई-पुणे महामार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झालेल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांना निवेदन दिले होते. निवेदनाचा विचार करून त्यांना तातडीने नियुक्ती करण्यात येणार आहे.