मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर उद्या (१० मार्च) मिटण्याची दाट चिन्हे आहेत. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब हे उद्या विधिमंडळात मोठी घोषणा करणार आहेत. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. त्यात परब हे घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाशी मिळते जुळते लाभ देण्याबाबत मंत्री परब हे घोषणा करण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूण १६ मागण्या आहेत. त्यावर सरकार सकारात्मक आहे. मंत्री परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन उद्या विधिमंडळात मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळे एसटीचा संप मिटण्याची चिन्हे आहेत.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयातही गेला. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेला अहवाल सादर करण्यात आला आहे. एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यानंतर आता सभापती निंबाळकर यांच्या निर्देशानुसार, सरकारने आमदारांची समिती स्थापन केली आहे. त्यानुसार या समितीने आझाद मैदानातील एसटी कर्मचारी आंदोलकांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगिचले जात आहे. मंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भाजपचे प्रवीण दरेकर, शेखर चन्ने, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.
२८ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे खासकरुन ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे एसटी महामंडळाचे आतोनात नुकसान झाले आहे. राज्यात एसटीचे ८२ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. त्यातील ५४ हजारापेक्षा जास्त कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत.