मुंबई – येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पाडळकर यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. राज्य सरकारने पगारवाढीचा उत्तम निर्णय घेतला आहे, असे सांगत या दोन्ही नेत्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, एसटीचे जोपर्यंत राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजूनही एसटीचा संप सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी गेल्या दोन आठवड्यांपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे राज्यभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. खासकरुन ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसत आहे. जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असे नारे आता आंदोलकांकडून दिले जात आहेत. राज्य सरकारने काल सर्व आंदोलकांसाठी मोठा निर्णय घेतला. साडेसात हजार रुपयांहून अधिक पगारवाढ देण्याचे सरकारने घोषित केले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवासमाप्तीचे आदेशही मागे घेऊ आधी कामावर हजर व्हा, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केले आहे. मात्र, अद्यापही आंदोलक माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. खोत आणि पाडळकर हे आंदोलकांचे नेतृत्व करीत होते. आता दोघेही बाहेर पडल्याने आंदोलकांचे नेतृत्व कुणाकडेही नाही. परिणामी, हे आंदोलन भरकटते की आणखी काही काळ चालू राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.