किरण घायदार, नाशिक
राज्य परिवहन महामंडळ सध्या वाहनखरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, नाशिक विभागात तब्बल 20 E शिवाई बसेसचे आगमन झाले आहे. या बसेस नाशिक – पुणे या मार्गांवर सध्या सुरु आहेत.
सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसन क्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत. एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई- शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
नागपूर-चंद्रपूर या मार्गावर, त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक- छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.
राज्यात १३७ बस दाखल
राज्याच्या विविध भागात आतापर्यंत १३७ ई- बस दाखल झालेल्या आहेत. १३७ पैकी ३८ शिवाई ई-बस छत्रपती संभाजीनगर विभागातील सिडको विभागाला मिळालेल्या आहेत. उर्वरित बस राज्यभरात विविध ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. अनेक विभागातील ई-चार्जिंग हब आगामी आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या परिवहन विभागच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई- बसमध्ये हायटेक सुविधा असल्या तरी त्याचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाहीत. जालन्यासाठी १३०, बीडसाठी ३०० रुपये, पैठणला १३० रुपये असा दर आहे. तर लालपरीत हेच दर अनुक्रमे ९० व २०० असे आहेत. इच्छा असूनही सामान्यांना या बसमधून प्रवास करणे शक्य होत नसल्याने ते साध्या बसमधून प्रवास करत आहेत. ई बसची दरवाढ कमी केल्यास यातून आरामदायक प्रवास शक्य आहे.