मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अॅड. गुणरत्न सदावर्ते समर्थित संचालक मंडळाच्या निर्णयांमुळे एसटीची बँक डबघाईस आल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात एका सभासदाने तक्रार केली आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा एसटी कर्मचारी चर्चेत आले आहेत.
जवळपास काही वर्षांपासून कामगार संघटनेचे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेवर वर्चस्व होते. सदावर्ते पॅनलने सत्ता मिळवल्यानंतर बैठकींमध्ये मांडलेल्या ठरावांवरून वाद निर्माण होत होते. संचालकांच्या मनमानीला कंटाळून महाव्यवस्थापकांनी देखील राजीनामा दिला. एसटी बँकेत जुलै महिन्यात नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. परंतु या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने आणि चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ७० वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला येत आहे.
नवे संचालक मंडळ स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर आल्यानंतर अंदाजित ११० कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याचा दावा एका सभासदाने केला आहे. बँकेचा पतगुणोत्तर (क्रेडिट डिपॉझिट रेशो) ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरबीआयच्या नियमांनुसार हा रेशो ७२ टक्क्यांपर्यंत असायला हवा मात्र तो अधिक असल्यानं बँकेत आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आहेत. सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची आयुष्याची सेवानिवृत्तीनंतरची पुंजी या बँकेत आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयामुळे बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
२३०० कोटींच्या ठेवी
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप.बँकेत जवळपास २ हजार ३०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नव संचालक मंडळ आल्यानंतर एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर कंत्राटी नव्या एमडी पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. या पदासाठी अनुभव गरजेचा असताना एका २२ वर्षीय अननुभवी तरुणाला संधी दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
ST Cooperative Bank Sadavarte Panel Fraud Complaint Commissioner
Directors Banking