मुंबई – राज्यभरात सुरू असलेल्या एशटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसून येत आहे. राज्यात विविध ठिकाणी अनेक कर्मचारी कामावर हजर झाले असून त्यांची संख्या २० हजारावर पोहचली आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये सेवा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात संप मिटण्याची चिन्हे व्यक्त केली जात आहे.
गेल्या वीस दिवसांपासून लाल परी राज्यात लालपरी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाची बस गाडी रस्त्यावर धावत नसल्याने एकीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत, तर अद्यापही एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने पगार वाढीची घोषणा करूनही बहुतांश कर्मचारी अद्यापही संपावर जात आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने देखील याबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारने थेट वाढीव पगार रोखण्याचा दम कर्मचाऱ्यांना दिला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कडक भूमिका घेत पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, असे स्पष्ट करीत आता सरकारला वेगळा विचार करावाच लागेल, असा इशारा देखील दिला आहे.
संप मिटवण्यासाठी मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि १० वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, असे सांगून संप मागे घ्यावा, असे आवाहन परब यांनी या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केले. सरकारने भरघोस वेतन वाढ दिली आहे. केवळ एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. न्यायालयाच्या समितीच्या हातात आहे. अहवाल आल्यावर त्यावर विचार होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु आता एसटी बंद ठेवणे कर्मचारी, सरकार आणि ग्राहकांना परवडणारे नाही. आर्थिक भार सोसायचा आणि एसटी बंद ठेवायची असे होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल. पगारवाढ दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही. मात्र बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीने एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.
सरकारच्या वेतनवाढीच्या निर्णयानंतर सुमारे २० हजार कर्मचारी कामावर परतल्याचे सांगण्यात येत आहे. तर आतापर्यंत ३२१५ कर्मचाऱ्यांना कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. तर १२२६ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यातील सुमारे ३७ बस आगार (डेपो ) सुरु झाले आहेत.