मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती. या योजनेला राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या ८७ दिवसात दोन कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री. चन्ने यांनी सांगितले.
ST Bus MSRTC Free Travel Service Benefits