मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस असून अद्यापही कुठलाच तोडगा निघालेला नाही. मात्र, या संपामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंळाने कर्मचाऱ्यांवर कारवाईला जोर दिला आहे. त्यामुळेच राज्यात आतापर्यंत तब्बल २ हजार ५३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यात आज दिवसभरातील १ हजार १३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. तसेच, हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयातही गेला. न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, त्यावर कर्मचारी संघटना समाधानी नाहीत. त्यामुळे संप सुरूच आहे. राज्यभरातील अनेक कर्मचारी मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी जमले आहेत. आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून कुठलाही तोडगा होताना दिसत नाही. त्यामुळेच या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1458807864835796995