मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. खासगी बस वाहनांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत असून प्रवास भाडेही दुप्पट ते तिप्पट आकारले जात आहे. ऐन दिवाळीच्या सुटीत मोठी गैरसोय होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
राज्यभरात एसटी महामंडळाचे एकूण २५० डेपो आहेत. यापैकी जवळपास सव्वा दोनशे डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली होती. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर महागाई भत्ता वाढवून देण्यात आला. तसेच, दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. मात्र, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. जोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही आणि अन्य मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला. काही डेपोंमध्ये संप सुरू होता. तर, अन्य डेपोंमध्ये कर्मचारी कामावर आले. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयातही गेले. न्यायालयात सुनावणी सुरू झाल्याने अन्य डेपोंमधील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेतला. त्यामुळेच रविवार मध्यरात्रीपासून (१० नोव्हेंबर) राज्यभरातील अनेक डेपोंमध्ये संप सुरू झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. खासगी बस आणि वाहनांशिवाय कुठलाही पर्याय नसल्याने दिवाळी सुटीतच प्रवाशांची परीक्षा सुरू झाली आहे. कुटुंबासह गावाकडे जाणाऱ्या किंवा गावाकडून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संपामुळे एसटी बस आगार ठप्प झाले आहेत.