मुंबई – एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्याच्या आग्रही मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशा निर्णयावर एसटी कर्मचारी आले आहेत. त्यामुळेच मुंबईतील आझाद मैदान गाठण्याचे आवाहन सोशल मिडियातून केले जात आहे. त्यास प्रतिसाद लाभत असून राज्याच्या सर्व भागातून एसटीचे कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळेच आझाद मैदानातील आंदोलकांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे.
गेल्या तीन आठवड्या पासून सुमारे १० हजार एसटी कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानावर आपल्या कुटुंबासह कर्मचारी या मांडून आहेत कोणत्याही परिस्थितीत एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरूच आहे. तसेच यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या. मात्र, या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याचे बघून आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सुमारे ४० कर्मचाऱ्यांना तुरुंगात डांबले असून संपूर्णपणे संप मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे. दिवाळीच्या सणापासूनच एसटी बसची सेवा ठप्प असून एसटीचे सर्व कर्मचारी संपावर ठाम आहेत. एकीकडे मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले.
सरकारले संप मागे घेण्याचे केलेले आवाहन कामगारांनी धुडकावले आहे. त्यामुळे कारवाईचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाने २३८ रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुर्वी संपात सहभागी झालेल्या आणखी २,७७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. भाजप नेते दरेकर म्हणाले की, कर्मचारी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत आहेत. परंतु जर सरकार आंदोलन दडपत असेल, तर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल. जर आंदोलन हिंसक झाले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे. तसेच सरकारच्या दडपशाहीचाही त्यांनी निषेध केला.
मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाड येथून एसटी कर्मचारी पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलन मुंबईकडे निघाले होते. त्यांना मनमाड रेल्वेस्थानकाबाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागण्या मान्य करेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे संपाची कोंडी फुटत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड होत होत आहेत. दरम्यान, आज पैठण आगारातून सोडण्यात आलेल्या एका बसच्या काचा फोडण्यात आल्याने सदर बस पुन्हा पैठण आगारात परत पाठविण्यात आली. त्याचवेळी राज्यभरातील अनेक कर्मचारी मुंबईला येत आहेत. मात्र, त्यांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्या मध्ये आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. सोशल मिडियात व्हायरल झालेला व्हिडिओ असा
https://twitter.com/MChormal/status/1462103258080563203