मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल सहा महिन्यांचा संप करुनही एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या आणि अतिशय कमी वेतनावर काम करणाऱ्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती अद्यापही रखडलेलीच आहे. ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
सध्या महागाईमुळे आर्थिक खर्च भागवणे अनेकांना आव्हानासमान झाले आहे. घरभाडे, किराणा सामान, औषधोचार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च दुपटीने वाढला आहे. यावर एखादा अभ्यासगट किंवा समिती निर्माण केली पाहिजे. त्या समितीला कालमर्यादा ठरवून देऊन अभ्यास पूर्ण अहवालाच्या आधारे एसटीच्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
सहा महिने प्रदीर्घ संप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या हाताला काहीच ठोस मिळालेलं नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड मानहानी झाली. सध्या एसटी महामंडळ आपल्या परीने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करीत असला तरी याच कर्मचाऱ्याची अवस्था खचलेली आणि निराश आहे. त्यांना शासनाने अलीकडेच दिलेले वेतन वाढ ही अनियमित आणि अत्यल्प असून, पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांसाठी त्याला पुन्हा आंदोलन करावे लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने बरगे यांनी केली आहे.
मागील तीन वर्ष एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना गणवेश किंवा गणवेशाचे कापड दिले गेले नाही. ते कापड त्यांना तातडीने द्यावे, याशिवाय शासानाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम त्वरित दिली पाहिजे. कारण स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांच्या औषधोचारासाठी अनेकांनी कर्ज काढलं असून हा खर्च काही लाखांच्या घरात आहे.
विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांना बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या राहण्या-जेवण्याची प्रचंड गैरसोय होत असून यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीनं लक्ष घालून त्यांच्यासाठी चांगली विश्रांती गृह आणि सुविधा निर्माण करण्यासाठी दुरुस्ती साठी निधी प्राप्त करून द्यावा, अशी विनंती केली आहे. याबरोबरच, नव्या बसेस, बस स्थानकांसाठी घेण्यासाठी निधीचीही मागणी करण्यात आली आहे.
ST Bus Employee Demands 6 Months Strike