मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थितीत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता मिळावा. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचा-यांनी संप पुकारल्यामुळे राज्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या संपामुळे एेन गणेशोत्सवात प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. पण, आता संप मागे घेतल्यामुळे पुन्हा एसटी रस्त्यावर धावणार आहे.