मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीत झालेल्या गैव्यवहारप्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सरनाईक म्हणाले, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. रा. प. मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी पुणे येथील भांडार खरेदी बाबत सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, रा. प. अंतर्गत लेखा परिक्षण पथक, पुणे यांच्याकडून विशेष लेखा परिक्षण करण्यात आले. या प्रकरणी अनियमितता झाल्याचे दिसून आले.
या प्रकरणी १५ अधिकाऱ्यांची चौकशी केली असता ते अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्या मासिक पगारातून १० टक्के रक्कम घेण्यात आली आहे. महामंडळामार्फत महालेखापरीक्षकांनाही चौकशी करण्याची विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.