मुंबई – कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर चर्चा झाली. त्यानंतर पवार यांनी पहिल्या टप्यात ६०० कोटी देण्याचे मान्य केले. ही मदत पगार व दैनंदिन खर्चासाठी देण्यात आली आहे.
या अगोदर सुध्दा शासनाने १ हजार कोटी रुपये एसटीला मदत दिली होती. या सर्व मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परब यांनी आभार मानले आहेत.अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला. त्यातून ती सावरत असतांनाच दुस-या लाटेत एसटीचे आर्थिक गणितच बिघडले. त्यामुळे या काळात शासनाने मदत देत एसटीला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. या मदतीनंतरही एसटीला अजून आर्थिक मदतीची गरज असणार आहे. त्यामुळे एसटीने नवीन नवीन स्त्रोत सुरु केले आहेत. त्यातून एसटीला किती पैसे मिळतात हे महत्त्वाचे आहे. देशभरातील सार्वजनिक सेवा देणा-या बसेस या तोट्यात आहे. त्यामुळे ही सेवा बंद करुन तीचे खासगीकरण करणे सुध्दा सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे शासनाची भरीव मदत या सेवेला तितकीच गरजेची आहे.