नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत पासची सेवा लागू करणे तसेच सर्व गाड्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांऐवजी १ वर्षाचा मोफत पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी होणार होती, मात्र नव्या सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे एसटीच्या संचालक मंडळाची ही बैठक रद्द करण्यात आली.
एसटी महामंडळामध्ये कार्यरत कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना राज्यात आणि राज्याबाहेर धावणाऱ्या एसटी बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी सध्या दोन महिन्यांचा पास मिळतो, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांचा पास मिळतो. मात्र या पासची मुदत वाढवावी याबाबत एसटी संघटना गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार ४ एप्रिल २०२४ रोजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे सादर करण्यात येईल, असेही मान्य केलेले आहे.
सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ४ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोफत पासबाबत आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.