नाशिक (इंडिय दर्पण वृत्तसेवा) – एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या २ ते ३ दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून त्याबाबत आता तातडीने कारवाई करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना मंजूर झालेली दिवाळी भेटीची रक्कम मिळाली नाही. परंतु, निवडणूक झाल्याने आतातरी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची रक्कम दिली जावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती . एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे पत्र एसटी प्रशासनाने १५ ऑक्टोबर रोजी सरकारला पाठवले होते. त्याला सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीसाठीचा आचारसंहिता लागू झाल्याने ही रक्कम देण्यात अडचण निर्माण झाली. परिणामी, कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे, एसटी प्रशासनाने ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करून ही रक्कम वितरित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.
२९ नोव्हेंबर रोजी दिवाळी भेट….
२६ नोव्हेंबर रोजी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॅा माधव कुसेकर तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीषजी देशमुख, महामंडळाचे महाव्यवस्थापक (क व औ स)मा. मोहनदास भरसट, तसेच यंत्र विभागाचे महाव्यवस्थापक कोलारकर , महामंडळाचे मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनावडेकर, उपमहाव्यवस्थापक वाहतूक चेतन हसबनीस तसेच मुख्यालय कामगार अधिकारी घाडगे यांच्या समवेत मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. या बैठकीत कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश बावा, कोषाध्यक्ष अनिल श्रावणे,राज्य महिला संघटक सचिव सौ शीलाताई नाईकवाडे, मुख्यालय सचिव श्री जनार्दन अंकोलेकर हे उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये दिवाळी भेट देण्यासंदर्भात संघटनेने आचारसंहितेपूर्वीच पाठपुरावा केला असून यापूर्वीच्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी च्या बैठकीत कुसेकर यांनी मंजुरी दिलेली आहे.आता निवडणूक आयोगाची आचारसंहिता शिथील झाल्यामुळे दिवाळी भेट तातडीने देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी महामंडळाच्या वतीने दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट वाटप करण्याचे मान्य करण्यात आले.