नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट अद्यापपर्यंत मिळाली नाही. पुढे हे मिळण्याची शक्यता धुसर असल्याने यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे.
दरवर्षी एसटी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची अग्रीम उचल व ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येते. कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी दिवाळीपूर्वीच अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट देण्यात येते. परंतु यावर्षी दिवाळी सुरू झाली तरी यावर अद्याप निर्णय झाला नाही.
रविवारी भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. दोन दिवस उरले तरी यावर निर्णय झाला नसल्याने दिवाळी भेट व अग्रीम रक्कम मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह विविध एसटीच्या संघटनांत नाराजी पसरली आहे.