किरण घायदार, नाशिक
दिवाळीनिमित्त घराकडे निघालेले चाकरमाने, विद्यार्थी तसेच सुटीच्या काळात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना खिसा हलका करावा लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ केली जाते.
महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवनेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली आहे.
एसटीची भाडेवाढ २५ ऑक्टोंबर २०२४ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच,ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.
कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३८७ कोटींची मदत दिली आहे. या आर्थिक मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत कर्मचाऱ्यांनी वेतन मिळणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच सण अग्रिम म्हणून साडे बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यातच आता राज्य सरकारने एसटी महामंडळाला ३८७ कोटींची मदत केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.