किरण घायदार, नाशिक
कळवण आगारातील वाहकाने प्रवाशाचे पाच लाख व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग परत केली. सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील रहिवासी विलास चव्हाण कळवण आगारात बस वाहक आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना कळवण आगाराची बस कळवणहून शिर्डी कडे जात असताना मनमाड येथून काही परप्रांतीय प्रवासी बिकास कुमार पाठक बसमध्ये बसले.
ते कोपरगाव येथे जमीन खरेदीसाठी आले होते. अनवधानाने त्यांची बॅग बस मधेच विसरुन ते उतरून गेले. काही वेळानंतर ही त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिर्डी बस स्थानकात गाठत गाडीची चौकशी केली. तोपर्यंत वाहक चव्हाण यांनी बॅग चेक केली असता तिच्यात रोकड व काही महत्त्वाचे कागदपत्र असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती बॅग कार्यालयात जमा करण्यासाठी जात असताना प्रवाशांची ओळख पटवून बॅग त्यांना परत केली.
श्री चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कळवण आगार व्यवस्थापक डी. के. महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल बोरसे, वाहतूक अधिक्षक वसंत लहारे, सुरेश पवार, चालक ए टि जाधव, अनुप खैरनार, के के पवार, प्रशांत गोसावी उपस्थित होते.