नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांएवढे होण्यासोबतच काही प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचारी कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि. २३) राज्यभर निदर्शने व द्वारसभेचे आयोजन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. महामंडळातील कामगारांचा वेतन प्रश्न निकाली काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीला आठवडाभरात अहवाल सादर करणे बंधनकारक होते.
त्यानंतर २० ऑगस्टला मुख्यमंत्री पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अंतिम निर्णय देणार होते; परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. यामुळेच प्रत्येक डेपोमध्ये निदर्शने आणि द्वारसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.