नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती मधील १० वी मध्ये ९० %पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. MH- CET, NEET, JEE इत्यादी पुढील व्यावसायिक व उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करता यावी यासाठी विद्यार्थ्यांना विशेष अर्थसाहाय्य देण्यात येते. ही योजना मार्च २०२१ मधील इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे. त्याकरीता विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, यासाठी पालकांनी स्वघोषणापत्र द्यावयाचे आहे.
सोबत विद्यार्थी/वडील यांचा जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता १० वी चे गुणपत्रक, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र इत्यादी दस्ताऐवज कागदपत्राच्या साक्षांकित प्रती सह अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज “डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था”(बार्टी), पुणे या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे. योजनेच्या अटी-शर्ती, निकष व कार्यपद्धती, अर्जाचा नमुना या बाबतची माहिती बार्टीच्या संकेतस्थळ https://barti.in/notice-board.php यावर देण्यात आली आहे.