पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन बँकेने विविध राज्यांमध्ये सुरक्षा रक्षकांच्या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी उत्तीर्णांना संधी मिळणार आहे. उद्यापर्यंत (९ मार्च) या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
माजी सैनिकांना वेगवेगळ्या ठिकाणी निवृत्तीनंतरही नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. इंडियन बँकेमध्ये भरतीसाठी वेळेत अर्ज केल्यास माजी सैनिकांचे बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वास्तविक, इंडियन बँकेने दहावी पास उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्यापूर्वी माजी सैनिकांनी या भरतीच्या पदांसाठी विहित पात्रता निकष पूर्ण केले आहेत की नाही याची खात्री करावी. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांना इंडियन बँकेच्या www.indianbank.inच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर ऑप्शनवर क्लिक करत दिलेल्या रकान्यांमध्ये माहिती भरावी. बँकेच्या या भरती अंतर्गत, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील माजी सैनिक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. इंडियन बँकेत २०२ पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी देशभरात भरती केली जात आहे. इंडियन बँक सबऑर्डिनेट स्टाफ कॅडर सिक्युरिटी गार्डच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.indianbank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पदवी किंवा उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. तसेच जर तुम्हाला १५ वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही माजी सैनिकांच्या कोट्याअंतर्गत अर्ज करू शकता. बँक भरतीच्या निवड प्रक्रियेत १०० गुणांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणीसाठी ४० गुण, शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी ४० गुण, स्थानिक भाषा चाचणीसाठी १० गुण तसेच वैध हलके मोटार वाहन व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १० गुण जोडून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अंतिम निवडीमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, त्यांना वयाच्या आधारे रँकमध्ये प्राधान्य दिले जाईल.