१० वी व १२वी २०२२ परीक्षेसाठी
विद्यार्थी व पालकांनी लक्षात घ्यावयाचे २२ मुद्दे
१० वी व १२ वी त शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे पालकच जास्त काळजीत असतात असे चित्र सध्या आपल्याला दिसत आहे. आपल्या पाल्याला मिळालेले गुण, त्यांची आवड, कौशल्ये आणि त्यांच्यात असलेल्या गुणवैशिष्टयांनुसार ऍडमिशन मिळेल कि नाहीआणि घेतलेल्या शिक्षणावर पुढील करिअर अवलंबून आहे तसेच निवडलेल्या अभ्यासक्रमास स्कोप असेल की नाही, अशा सर्व प्रश्नांचं रूपांतर काळजीत होणं हे पालकांच्या दृष्टीने साहजिकच आहे. परंतु काळजी करण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार केल्यास आपल्या पाल्यांना ही त्याची मदत होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात पालकांची मोठी भूमिका असते. आपल्या पाल्याला समजून घेणे आणि परीक्षेच्या काळात त्याला मदत करणे ही सर्वच पालकांची इचछा असते परंतु आपली मदत कशी होईल हे काही वेळेस समजत नाही. अशावेळेस खालील २२ मुद्दे मदत करतील.

(मानसशास्त्र विभाग, भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक)
मो. 8805362652
१. उजळणी वर भर द्यावा
स्मृतीच्या तत्वानुसार जो अभ्यास केला आहे त्याची जितकी उजळणी जास्त तितकी ती माहिती स्मरणात राहते. उजळणी न केल्यास त्या अभ्यासाचे किंवा माहितीचे विस्मरण होते. आपण केलेल्या अभ्यासाचे विस्मरण होऊ नये यासाठी उजळणी वर भर द्यावा.
२. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे
विषयांची काठिण्य पातळी कमी अधिक असल्याने नेमका कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा आणि दिवसातून किती विषय हाताळावेत हे समजत नाही. अशावेळेस आठवडी वेळापत्रक तयार करावे. कठीण व सोप्या विषयांसाठी वेळेचे संतुलन राखून वेळापत्रक तयार करावे. पाठांतरावर भर न देता विषय समजून घेण्यावर भर द्यावा. विषय समजल्यास प्रश्नांची उत्तरे आपल्या भाषेत देण्यास मदत होते.
३. लिहिण्याचा वेग
परीक्षेच्या वेळेस दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करणे हे देखील एक आव्हानच आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काही दिवस आधी वेळ लावून प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव करावा. कमी वेळेत सविस्तर उत्तराची मांडणी करण्याचा प्रयत्न करावा.
४. पूर्वीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे
पूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडविल्यास पेपर सोडवण्याची तयारी होते. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव असल्यास पेपर देताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही व पेपर ची भीती देखील कमी होते.
५. आहार आणि झोपेचे संतुलन
सात्विक आहार आणि पूर्ण झोप ही नेहमीच आरोग्यदायी असते. जेवण्याच्या आणि झोपेच्या वेळेत संतुलन राखणे महत्वाचे आहे. खूप जागरण करून अभ्यास करणे आणि अवेळी जेवण केल्यास त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होतात.
६. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करावी
आपल्या पाल्याने परीक्षेच्या वेळेस कोणताही ताण घेऊ नये यासाठी पालकांनी स्वतः आणि आपल्या मुलांमध्ये सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करावी. सकारात्मक विचार करणे, परीक्षेकडे एक आव्हान म्हणून पाहणे, आपले पूर्वीचे चांगले अनुभव डोळ्यासमोर आणावेत, मित्रांशी तुलना न करता आपण परीक्षेसाठी सक्षम आहोत असा विचार करणे, मी परीक्षेत नक्कीच यशस्वी होईल असा आत्मविश्वास बाळगणे.
७. ताण कमी करणे
परीक्षा ही एक ओझं नसून आपल्याला यशाकडे नेण्याचा मार्ग आहे अशी भावना पालकांनी आपल्या मुलांमध्ये निर्माण करावी.
८. अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करणे
कोणतेही काम करण्यासाठी घरातील आणि आजूबाजूचे वातावरण चांगले असल्यास काम चांगले होते. आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी देखील घरातील वातावरण चांगले असल्यास त्यांना अभ्यास करण्यास हुरूप येतो व कोणतेही बर्डन राहत नाही.
९. योग्य भाषेचा वापर
मुलांशी संवाद साधत असताना पालकांनी योग्य भाषा आणि योग्य शब्दांचा वापर करावा. काही वेळेस पालकांच्या मनाप्रमाणे मुले वागत नसल्यास किंवा सांगितलेल्या गोष्टी ऐकत नसल्यास पालकांचा राग अनावर होऊन मुलांना अपशब्द वापरले जातात. अशावेळेस रागावर नियंत्रण ठेऊन पालकांनी योग्य भाषा व शब्दांचा वापर केल्यास मुलांशी संवाद चांगला होतो.
१०. प्रगती कडे लक्ष द्यावे
आपल्या मुलाची प्रगती काय आहे हे पूर्वी दिलेल्या परीक्षेतील गुणांपेक्षा आताच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून बघता येते. अधून मधून शिक्षकांना भेटून मुलांच्या प्रगतीची चौकशी करावी.
११. स्व अभ्यासास प्रवृत्त करावे
स्व अभ्यासातून विद्यार्थी स्वतः च्या चुका समजून घेऊन त्या सोडवतात. विषयाचं आकलन हे स्व अभ्यासाने चांगले होते. कोणावर अवलंबून न राहता स्वतंत्रतेने अभ्यास करण्याची सवय लागते. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना स्व अभ्यासावर भर देण्यास सांगावे.
१२. पारितोषिक देऊन प्रोत्साहन द्यावे
पारितोषिक हे धन प्रबलक आहे. पारितोषिक दिल्याने कामाची पुनरावृत्ती होते म्हणून मुलांनी चांगला अभ्यास केल्यास त्यांना योग्य ते पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करावे.
१३. परीक्षेसंदर्भातील योजनेची चर्चा करावी
परीक्षे संदर्भात आपल्या मुलांनी काय योजना आखली आहे या बाबत एक मित्र होऊन त्यांच्याशी चर्चा करावी. योजना योग्य असल्यास त्याचे समर्थन करावे, योग्य नसल्यास मार्गदर्शन करावे.
१४. विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवावे
प्रसार माध्यमे, सामाजिक माध्यमे, दूरदर्शन, मोबाइल अशा अनेक गोष्टी ज्या मुलांना अभ्यासापासून विचलित करतात त्यांचा वापर कमी करावा. या सर्व गोष्टींची जेवढी गरज आहे तेवढाच त्याचा वापर ठेवावा. अनावश्यक वापरामुळे नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती द्यावी.
१५. परीक्षा झाल्यानंतर मुलांशी चर्चा करा
परीक्षा झाल्यानंतर पेपर चे विश्लेषण करण्यात त्यांना मदत करावी.
१६. काळजी करण्या पेक्षा काळजी घेण्यावर भर द्यावा
काय होईल? कसे होईल? असे प्रश्न स्वतः ला विचारण्या पेक्षा आपल्याला काय तयारी करायची आहे, कशी तयारी करायची आहे याचा विचार करून मार्ग काढणे जास्त महत्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याची कुवत बघूनच त्यांच्या कडून अपेक्षा कराव्यात.
१७. मुलांसाठी वेळ काढावा/राखून ठेवावा
आजच्या धकाधकीच्या जीवनात आई वडील दोघेही कामावर जातात, त्यांना वेळ काढणे जरी अवघड असले तरी थोडा वेळ आपल्या मुलांसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. परीक्षेच्या काळात मुले गोंधळलेली असतात, घाबरलेली असतात अशा वेळेस आई वडील जर त्यांच्या सोबत असतील तर नक्कीच त्यांना मदत होईल.
१८. आत्मविश्वास निर्माण करावा
परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकतात. आपले मूल घरातील एक महत्वाची व्यक्ती आहे याची जाणीव त्यांना करून द्यावी.
१९. परीक्षेनंतरच्या ताणाचे व्यवस्थापन करावे
बरेच विद्यार्थी परीक्षा होऊन गेल्यानंतर निकालाचा विचार करतात, निराश होतात. अशावेळेस पालकांनी निकाल लागण्या आधीच निराश होण्याची आवश्यकता नाही तर मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यास प्रोत्साहन द्यावे.
२०. तथ्यांचा स्वीकार करून पुढे जाण्यास मदत करावी
परीक्षा झाल्यानंतर काही वेळेस विद्यार्थी अयशस्वी होतात किंवा कमी गुण मिळतात. अशावेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन जे झाले आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाण्यास मार्गदर्शन करावे.
२१. भविष्यातील करिअर चा अतिरिक्त विचार न करणे
पालकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करावा परंतु अतिरिक्त विचार करू नये. मुलांचे निर्णय आपण घेण्यापेक्षा त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावे. मार्गदर्शन करावे पण मार्ग निवडून देऊ नये. याने जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ते सक्षम होतात व पालक म्हणून काळजी करण्याची आवश्यकता भासत नाही.
२२. गरज पडल्यास तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा
ज्या वेळेस पालकांना वाटेल की, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण काही मदत करू शकत नाही किंवा आपल्या कडून हे शक्य नाही त्या वेळेस तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरते.
वरील मुद्द्यांचा विचार केल्यास आणि अंमलबजावणी केल्यास नक्कीच मुलांना घरात चांगले वातावरण मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, परीक्षेस योग्य रीतीने सामोरे जातील, परीक्षेच्या आधी आणि नंतर येणारा ताण हाताळू शकतील, पालक आणि पाल्य यांच्यातील संबंध सुधारतील.