मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावी-बारावीच्या परीक्षा आटोपल्यावर मुलांना आणि पालकांना उत्सुकता असते ती निकालाची. पण शेवटच्या क्षणापर्यंत निकाल कधी लागणार, हे माहिती नसतं. त्यामुळे सर्वांची नजर बातम्यांवर असते. आता जून महिन्यात दोन्ही परीक्षांचे निकाल लागतील अशी माहिती पुढे येत आहे.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचा समावेश होता. अश्यात निकाल कधी लागेल, याबाबत अनिश्चितता होती. मात्र आता उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने निकाल वेळेत लागणार आहे.
दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे. तर त्याआधी बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यातच लागणार आहे, एवढे मात्र जवळपास निश्चित आहे.
एवढ्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेला १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली. बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले होते.
हे होते नियम
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक नियम बदलले होते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी कठोर नियम जाहीर केले होते. मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर विकत घेतला तर परीक्षा रद्द केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं निलंबन केलं जाईल, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले होते.
SSC HSC Board Exam Results Will Delay or Not