विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून असलेली प्रचंड संभ्रमावस्था अखेर राज्य सरकारने दूर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा करीत इयत्ता दहावीच्या परीक्षेबाबतच्या शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला आहे. राज्य सरकार यंदा इयत्ता दहावीची परीक्षा घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच, जरी परीक्षा होणार नसली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. तशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
इयत्ता १०वीच्या निकालासाठी ५०, ३० आणि २० असा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. ५० गुण हे इयत्ता नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत असतील. तर, लेखी मूल्यमापनाद्वारे ३० गुण आणि २० गुण हे गृहपाठ, तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक यावर आधारीत राहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना निकालाचा हा फॉर्म्युला मान्य नसेल त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाईल, असेही गायकवाड यांनी जाहिर केले आहे. जून महिन्याच्या अखेरीस इयत्ता दहावीचा निकाल लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
इयत्ता दहावी निकालासंदर्भातील सरकारच्या सूचना अशा
– कोविड-१९ चा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.
– कोविड १९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा केली आहे. या सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
– नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णयानुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
– विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण
– संबंधित मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोना पूर्व काळातील ( सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.
– ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
– विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
– शाळा स्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे.
– मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.
– फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी (Repeater Student), खाजगी ( Form no.17), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे.
– श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील.
– राज्यातील दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही सदर धोरण तयार करताना केला आहे.
– विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक ( Optional ) CET घेणार आहोत . सदर प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
– इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील आणि त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
Board exam results for Class 10th will be based on exams conducted in Class 9th & 10th (internal marks). We will try to declare the results by the end of June. Those who aren't satisfied with their results can write CET exams later: Maharashtra Education Minister Varsha Gaikwad pic.twitter.com/vn3wxLSlju
— ANI (@ANI) May 28, 2021