मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता एसएससी बोर्ड दहावीच्या परीक्षा रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर अंतर्गत मूल्यमापन आणि गुणप्रदान करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन करून सीबीएससी बोर्ड निकाल देणार आहे. या निकालावर समाधान न झाल्यास विद्यार्थ्यांना जूनमध्ये दुसरी संधी दिली जाणार आहे, असे सीबीएससी बोर्डाने स्पष्ट केले आहे. याच धर्तीवर एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा घेता येईल का, याबाबत तज्ज्ञांशी बोलून घेतला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सीबीएससी बोर्डाप्रमाणेच राज्यातही दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. सीबीएससी बोर्डाच्या निर्णयानंतर एसएससी बोर्ड विचार करून निर्णय घेणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळ होत असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने सीबीएससी बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली, तसेच बारावीची परीक्षा स्थगित केली आहे.