विशेष प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता १०वीची परीक्षा व्हायला हवी यासाठी महाराष्ट्रातील एक वर्ग तयार नाही, तर एक वर्ग विविध मार्ग काढून परीक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह धरीत आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणारे धनंजय कुलकर्णी यांनी परीक्षा कशा घेता येतील, याचा एक मास्टर प्लॅन शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांना दिला आहे.
दहावीच्या परीक्षांचे नियोजन शाळांच्या स्तरावर आणि दोन सत्रांमध्ये केल्यास तसेच कोरोना नियमांचे संपूर्ण पालन केल्यास सहज शक्य आहे, असे धनंजय कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांमध्ये विभागणी करता येईल. त्यामुळे गर्दी होणार नाही आणि १५ दिवसांमध्ये परीक्षा आटोपती घेता येईल. परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या संदर्भात आणि निर्जंतुकीकरणाच्या संदर्भात काळजी घेतली तर धोका होणार नाही, असेही त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
परीक्षा म्हटल्यावर पालक गाड्या घेऊन रस्त्यावर येतील, गर्दी होईल आणि नियमांचे उल्लंघन होईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली तर फक्त सरकारी बसेसच रस्त्यावर असतील. परीक्षा मंडळाला एकाच दिवसाच्या दोन सत्रांच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांची कसरत करावी लागेल, एवढेच. यंदाच्या वर्षासाठी शाळेतील उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन केल्यास प्रश्न सुटू शकतो.
शाळेने ही व्यवस्था करावी आणि मुलांचे गुण शिक्षण मंडळाला कळवावे. जेणेकरून १५ दिवासंमध्ये निकालही शक्य होईल व ऑगस्टमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल, असे कुळकर्णी यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव विचार करण्यासारखा असला तरीही कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार परीक्षा घेण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.